चंद्रकांत पाटील यांची हमी : प्रचारार्थ कोथरूड परिसरात रॅलीचे आयोजन
पुणे – कोथरूडकरांचे जीवन आनंदी, सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याला राज्य सरकारच्या धोरणामार्फत ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची जोड देण्यात येईल, अशी हमी कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूड परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यामध्ये धडाडीने विकास पर्व राबवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे.
स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जातातच. मात्र, त्याला राज्य शासनाच्या ठोस नियोजन निर्णय आणि अंमलबजावणीची जोड मिळणे अतिशय गरजेचे असते. कोथरूडचे आमदार, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री या नात्याने चोख नियोजन ठोस निर्णय आणि कालबद्ध अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा जोरावर आपण दीर्घकालीन नागरी सुविधांची धोरणात्मक कार्यवाही करणार आहोत, असे पाटील यांनी नमूद केले.
राज्य सरकारमधील विकास पर्व अखंडित सुरू ठेवण्यासाठी पुण्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.
जंगी स्वागत, तर महिलांकडून औक्षण
कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारानिमित्त गुरुवारी आयोजित रॅलीला कोथरूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिकांनी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सकाळी 10 च्या सुमारास कर्वेरोडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर चौकातून इंगळे नगर, वरघडे चौक, भारत कॉलनी, शाहू कॉलनी, 11 नं पानद रोड, कुलाश्री कॉलनी (नागरिकांशी संवाद), संदीप खुंटाळे (श्रीमान चौक), शहीद चौक, 4 नं गल्ली, बिजली चौक, विकास चौक या मार्गावरून ही रॅली निघाली. कर्वेनगर मेन चौक, वडार वस्ती, श्रमिक वस्ती, होम कॉलनी, विकास चौकात रॅली झाल्यानंतर पाटील यांनी मतदारांना संबोधित केले, तसेच आगामी निवडणुकीत महायुतीच्या प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.