कोथरूड बनतेय बिझनेस हब…

– सागर येवले

पुणे – उपनगरे झपाट्याने विकसित होत असताना नागरिकांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेता फर्निचर, सोफा, ग्लास डेकोरेशन, कार, कपडे यासह इलेक्‍ट्रिक आणि इलेक्‍ट्रॉनिक व्यवसाय उपनगरांमध्ये वाढत असल्याचे दिसून येते. त्यामध्ये कोथरूड आणि बावधन परिसर अग्रेसर असून, “बिझनेस हब’ बनला आहे. या परिसरातील नागरिकांना सर्व सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध होत असल्यामुळे दिवसेंदिवस उपनगरांचा आणखी विस्तार होत आहे.

सर्वात वेगाने विकसीत झालेले उपनगर म्हणून कोथरूडची ओळख आहे. त्यामध्ये व्यावसायिकांचे मोलाचे योगदान आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील गजबज, वाहतूक कोंडी यामुळे नागरिक उपनगरांत राहण्यास येत आहेत. त्यामुळे फ्लॅट आणि बंगलो संस्कृतीला चांगले दिवस आले आहेत. तसेच, शहराला जोडणारा प्रमुख रस्ता आणि वाहतुकीसाठी सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे कोथरूडबरोबरच बावधन खुर्द आणि बुद्रुक, चांदणी चौक, पाषाण, सुतारवाडी, बाणेर, सुस रोड, वारजे यासह भूगावपर्यंत इमारतींचे जाळे पसरू लागले आहे.

साहजीकच त्यामुळे नागरिकांची संख्या वाढली असून त्यामध्ये श्रीमंतांपासून मध्यमवर्गीय कुटुंब या परिसरात राहायला आले. त्यामुळे घर सजावटीपासून आवश्‍यक असलेल्या वस्तूंना नागरिकांकडून मागणी वाढणार हे निश्‍चित. हीच गरज ओळखून व्यावसायिकांनीही या परिसरात स्वत:चे व्यवसाय सुरू केले. त्यामुळे फर्निचर, सोफा, किचन ट्रॉली, डायनिंग टेबल, ग्लास डेकोरेशन यासह इलेक्‍ट्रिक आणि इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंसाठी नागरिकांना शहरात येण्याची आवश्‍यकता नाही. सहज आणि मनासारखी वस्तू जवळच्या जवळ उपलब्ध होत आहे. एवढच नव्हे तर सर्व नामांकित कंपन्यांचे कार शोरूमही याठिकाणी आहेत. दरम्यान, वाढत असल्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी मुख्य गोडाऊनच याठिकाणी उभारले आहेत.

बावधन, कोथरूड, पाषाण परिसरांत नवीन इमारती, बंगलो तयार झाले आहेत. त्यातच आयटीसह अन्य तंत्रज्ञानातील कंपन्या या ठिकाणी उभारल्यामुळे नागरिकांकडून घरातील सजावटीसह आवश्‍यक वस्तूंना मागणी वाढली आहे. मनासारखी आणि दर्जेदार वस्तू घराजवळ उपलब्ध झाल्यामुळे वेळ आणि पैसा या दोन्हींमध्ये बचत झाली. ट्रान्सपोर्टचा खर्चही कमी होतो. याठिकाणी सगळ्यांना परवडेल अशा वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे ही मागणी वाढत असून ती पूर्ण करण्यासाठी व्यवसायाची व्याप्तीही वाढत आहे.
– भानू दीपक शर्मा, होम डेकोर


शहरात होलसेल भावात वस्तू मिळत असल्यामुळे नागरिक उपनगरांतून शहरात येतात. मात्र, शहरात येण्यासाठी पेट्रोलचा खर्च, खरेदी केलेल्या वस्तूंच्या वाहतुकीचा खर्च आणि त्यापेक्षाही वेळ याकडे आपले लक्ष जात नाही. काही किरकोळ वस्तू सोडल्या तर शहरात मिळणाऱ्या किमतीमध्येच बावधन, कोथरूड आणि भूगाव परिसरात वस्तू मिळत आहेत. मग शहरात जाण्याचा खटाटोप कशाला, असा विचार करून आम्ही इथेच सर्व वस्तू खरेदी करतो.
– अमित मोहोळ, रहिवासी नागरिक, बावधन

Leave A Reply

Your email address will not be published.