भोसरी, कोथरुडवरून दोन्ही पक्षांत रस्सीखेच; अंतिम निर्णयाकडे लक्ष
पिंपरी – शिवसेना भाजपामधील युतीची अद्यापपर्यंत घोषणा झाली नसली तरी युती होणार हे निश्चित समजले जात असून शहरातील भोसरी मतदारसंघावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नसल्याची बाब समोर आली आहे. चिंचवड भाजपाकडे तर पिंपरी शिवसेनेकडे जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. भोसरी कोणत्या पक्षाला सुटणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र शिवसेनेला कोथरुड मतदारसंघ देऊन भोसरी हा मतदारसंघ भाजपा स्वत:कडे घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
शिवसेनेने भोसरी हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर कोथरुड किंवा भोसरीपैकी एक मतदारसंघ सेनेला सुटावा असा प्रस्ताव दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता टिकविण्यासाठी कोथरुड शिवसेनेला तर भोसरी भाजपाला असे वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगण्यात आले आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीमधील जागावाटप अंतिम झाले असले तरी युतीमधील जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच अद्यापही संपुष्टात आलेली नाही.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन विधानसभा मतदारसंघापैकी 2009 च्या जागावाटपानुसार चिंचवड आणि भोसरी हे मतदारसंघ शिवसेनेकडे तर पिंपरी हा भाजपाकडे होता. मात्र गतवेळी 2014 साली दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्याने चिंचवडमध्ये भाजपा, पिंपरीत शिवसेना आणि भोसरीत अपक्ष महेश लांडगे हे विजयी झाले. महेश लांडगे यांनी भाजपाचे सहयोगी सदस्यत्त्व स्विकारल्यामुळे हा मतदारसंघ भाजपाकडे जाणार हे समजले जात होते. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणाहून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. तर महेश लांडगे यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुकीला सामोरे जात असल्याने कोणती जागा कोणाकडे जाणार या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. युतीच्या जागावाटपात शिवसेनेला 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. शहरातील पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही जागांबाबत एकमत झाल्याचे समोर आले असून दोन्ही पक्षांत भोसरीवरून रस्सीखेच सुरू आहे. चिंचवड हा मतदारसंघ भाजपाला तर पिंपरी हा शिवसेनेकडे राहणार असून शिवसेनेने भोसरीवर दावा केला होता. मात्र भाजपानेही हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने भोसरी न मिळाल्यास पुण्यातील कोथरुड हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी केली आहे.
कोथरुडमध्ये 2014 साली भाजपाचा आमदार निवडून आला होता. भोसरी आणि कोथरुड हे दोन्ही मतदारसंघात सध्या भाजपाचेचे आमदार आहेत. मात्र दोन्हीपैकी एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी आग्रही भूमिका सेनेने घेतल्यामुळे भोसरीऐवजी कोथरुड सेनेला जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भोसरीत भाजपाचा उमेदवार कोण? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालिकेतील सत्तेला फटका –
पिंपरी-चिंचवड महापालिकेत 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत कमळ फुलले. महापालिकेत सत्ता आणण्यात आमदार महेश लांडगे यांचा मोठा सहभाग होता. आताही निम्मे नगरसेवक हे महेश लांडगे यांचे समर्थक आहेत. भोसरीतून महेश लांडगे यांना संधी न दिल्यास महापालिकेतील सत्तेवर संक्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपाचे नेते भोसरीवरून कोंडीत अडकल्याचे बोलले जात आहे.