मुंबई – घरासाठीच्या कर्जवितरण बाजारपेठेत आपला हिस्सा वाढविण्यासाठी कोटक महिंद्रा बॅंकेने घरासाठी कर्जासाठीच्या व्याजदरात 0.25 टक्क्यापर्यंत कपात केली आहे.
आता हे व्याज दर 6.50 टक्क्यापासून सुरू होतील.
बॅंकेचे ग्राहक मालमत्ता विभागाचे अध्यक्ष अंबुज चंद्रा यांनी सांगितले की, बॅंकेने उपलब्ध केलेले व्याजदर हे दहा वर्षातील कमी पातळीवरील आहेत. ही सुविधा फक्त उत्सवाच्या काळात सुरू करण्यात आली असून आठ नोव्हेंबरपर्यंत जे ग्राहक कर्ज घेतल त्यांना ही कमी व्याजदराची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोटक महिंद्रा कंपनी बॅंकेने घरासाठीच व्याजदरात मर्यादित काळासाठी घट केल्यानंतर खाजगी क्षेत्रातील इतर बॅंकाही अशा प्रकारची घट करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. निर्बंध संपल्यानंतर घरासाठीची मागणी वाढत आहे.
त्यामुळे कर्ज पुरवठा वाढेल असे बऱ्याच बॅंकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक बॅंका या विषयावर निर्णय घेण्यासाठी आकडेमोड करीत असल्याचे बोलले जाते. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरांमध्ये कपात केलेली नसुनही बॅंकेकडील ठेवी वाढल्यामुळे भांडवल सुलभता निर्माण झाल्यामुळे बॅंक व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकली असे त्यांनी सांगितले.