मुंबई -कोटक महिंद्रा बॅंकने घरांसाठी कर्ज वितरण क्षेत्रात उलाढाल वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते. या बॅंकेने घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर कमी पातळीवर ठेवले आहेत. गेल्या आठवड्यात काही बॅंकांनी घरांसाठीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली असली तरी कोटक महिंद्रा बॅंकेचा व्याजदरात वाढ करण्याचा विचार नाही असे दिसून येते.
सध्या कोटक बॅंकेचे घरासाठीचे कर्जाचे व्याजदर 6.65% टक्क्यावरून सुरू होतात. यासंदर्भात बॅंकेचे गृहकर्ज विभाग अधिकारी अंबुज चंद्रा यांनी सांगितले की, या क्षेत्रात आम्हाला जास्त काम करायचे आहे. त्यामुळे आम्ही आव्हानात्मक व्याजदर ठेवले आहेत. या अगोदर या क्षेत्रात अधिक काम केलेल्या स्टेट बॅंक आणि एचडीएफसीने घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर वाढविले आहेत.
किरकोळ महागाई वाढली असली तरी गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने पतधोरणावेळी व्याजदरात वाढ केलेली नाही. मात्र आगामी काळात रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे काही बॅंका व्याजदरात वाढ करू लागल्या आहेत. भारतात गेल्या वर्षी घर विक्री बरीच कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रातील उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.