कोरेगावच्या लढतीत चुरस शिगेला

दोन शिंदेंच्या लढतीत रस्सीखेच; सातारा तालुक्‍यातील गावे ठरणार निर्णायक
सातारा  –
विधानसभेचा कोरेगाव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या कॉंग्रेसचा आणि शंकरराव जगताप यांचा गड. नंतर तसे कोणीही निवडून आले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला. पवार यांचे या मतदारसंघाशीही नाते भक्कम आहे. असे असताना भाजपने हा मतदारसंघ पोखरून काढला.

भाजपच्या महेश शिंदे यांनी काही वर्षांपासून मतदारसंघातील गाव न गाव पिंजून काढत आमदार शशिकांत शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जावळीतून कोरेगावात आलेल्या शशिकांत शिंदे यांनी आपले चांगलेच बस्तान बसविले. मतदारसंघ आपलासा करून टाकला. त्याला शह देण्याचा महेश शिंदे यांचा जोरदार प्रयत्न होता. युतीमधील शिवसेनेच्या वाट्याला असणारा कोरेगाव मतदारंसघ भाजपने आपल्याकडे खेचून घेण्यासाठी जीवाचे रान केले.

अगदी महेश शिंदे यांची उमेदवारीही जाहीर केली. तोपर्यंत भाजपला अनुकूल वातावरण तयार झाले. परंतु युती झाली आणि सारे चित्रच बदलून गेले. हा मतदारसंघ सोडण्यास शिवसेनेने नकार दिला. महेश शिंदे यांनी अखेरीस शिवबंधन स्वीकारून लढण्याचा पवित्रा घेतला. पण भाजप म्हणून रूजलेली तयारी आणि वातावरण वेगळेच बनू लागले. शशिंकात शिंदे यांच्या हॅट्ट्रिकसाठी त्यांच्या समर्थकांनी जोर लावला आणि आता दोन्ही शिंदेंमधील चुरस शिगेला पोचली आहे.

शशिकांत शिंदे म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील अनुभवी नेत्यांपैकी एक. माथाडी कामगारांच्या चळवळीतून साताऱ्याच्या राजकारणात ते कधी रंग भरू लागले, हे त्यांनाही समजले नाही. पूर्वीच्या जावळी मतदारसंघातून आमदारकी मिळवत त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्ह्यात मोठे वर्चस्व मिळविले होते. त्याच पक्षात शशिकांत शिंदे यांचे नेहमीच वर्चस्व राहिले.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर जावळीतून कोरेगावात आल्यावरही त्यांचा जनसंपर्क आणि प्रभाव वाढता राहिला. पक्षाच्या संघटनेतील महत्त्वाची पदे, तसेच मंत्रिपद मिळत गेल्याने शशिकांत शिंदे केवळ मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यातही सातत्याने चर्चेत राहिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते म्हणून राज्यात ते परिचित झाले. गेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळाली नाही.

तरीही शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघातील कामांसाठी आपली ताकद वापरत प्रयत्न सुरू ठेवले. त्यांचा संपर्कही राहिला. असे असतानाही खटावच्या महेश शिंदे यांनी मतदारसंघातील गावभेटी वाढविल्या होत्या. शशिकांत शिंदे यांच्या ताकदीला शह देण्यासाठी संघर्ष सुरू केला. गावोगावी महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली.

शशिकांत शिंदे यांच्यावर नाराज असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही जण एकत्र आले. त्यांची स्वतंत्र आखणी सुरू झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना ताकद देण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न सुरू ठेवले. भाजपने भक्कम शिरकाव केला. कोरेगाव, खटाव आणि सातारा या तीन तालुक्‍यांतील काही गावे कोरेगाव मतदारसंघात येतात. या सर्वच विभागात दोन्ही शिंदेची रस्सीखेच सुरू झाली.

अखेरच्या टप्प्यात मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे महेश शिंदे आता शिवसेनेकडून लढत आहेत. भाजप म्हणून त्यांनी मतदारसंघात बसवलेली घडी विस्कळित झाली. शिवाय शिवसेनेचे इच्छुक नेते आणि त्यांचे समर्थक महेश शिंदे यांच्या उमेदवारीने नाराज झाले. युती झाली तरी तो एकजिनसीपणा निवडणूक काळात कितपत राहणार, याविषयी साशंकता निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली.

या बदलत्या स्थितीत शशिकांत शिंदे यांनी आपली “स्ट्रॅटेजी’ बदलत संपर्क आणि प्रचारात जोरदार मुसंडी मारली. स्वपक्षासह युतीतील नाराज, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांशी संधान वाढविले. विरोधकांना आपलेसे करीत आपले टिकवून पुढे जात राहिले. त्यामुळे महेश शिंदे यांनी दिलेले आव्हान परतविण्यासाठी अनुभवी शशिकांत शिंदे यांनी प्रचाराच्या काळात जोरदार बांधणी केली आहे.

महेश शिंदे यांचा स्वतःचा भाग असल्याने खटाव तालुक्‍यातील गावांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, शशिकांत शिंदे यांनी ते ओळखून प्रदीप विधाते यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. कोरेगाव तालुक्‍यातील गावांमध्येही दोघांनीही समसमान ताकद लावली आहे. सातारा तालुक्‍यातील गावांमध्ये उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही राजांची ताकद उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण ठरते.

यावेळी दोन्ही राजांची भूमिका युतीच्या बाजूने असणार, हे कागदावर तरी खरे आहे. मात्र, दोन्ही राजे स्वतःच निवडणूक रिंगणात असल्याने त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात, ते या लढतीत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळेच दोन्ही शिंदेंमधील रस्सीखेच पणाला लागली आहे. कुणाच्या ताकदीने कुणाची रस्सी कुणाच्या बाजूने ओढली जाणार यावर शिंदे यांच्या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.