सातारा, ( प्रतिनिधी ) – मतदारसंघात पोलिस व प्रशासनाचा वापर करुन दबाव दाखवून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घेतला जात आहे. कोरेगाव मतदारसंघातील पोलिस व प्रशासन आमदाराचा कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.
असा आरोप करुन याविरोधात आम्ही गणेशोत्सवानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान , आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सत्ताधारी पोलिस, प्रशासनाचा गैरवापर करत असून हे सूत्र केंद्रातून राज्यात आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
शशिकांत शिंदे यांनी याबाबत आज जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमदार शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात सुरु असलेला हा प्रकार पोलिस व प्रशासनाच्या कानावर घातला आहे. मात्र त्यांच्याकडून ही दुर्लक्ष होत आहे.
या मतदारसंघातील पोलिस व प्रशासन एखाद्या आमदाराचा कार्यकर्ते म्हणून काम करतात का, हा माझा आरोप आहे. तुम्ही आमच्याकडे आला नाही,कारवाई करु अमिषे दाखवली जात असून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत.
नियम सर्वांना सारखा लावायचा असेल तर विनाकारण विरोधकांची कुंडली काढून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. तसेच टार्गेट करुन कारवाई केली जात आहे. दबाव टाकून प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत कोरेगावचे आमदार पक्षप्रवेश घेत आहेत.
पोलिसांनी तर एकाच गावातील आमच्या दोन कार्यकर्त्यांबाबत असा प्रकार केला असून पोलिस कार्यकर्त्यांच्या भूमिकेत वावरत असतील तर आम्ही पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.
पोलिसांच्या माध्यमातून प्रवेश घेतला जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. गणेशोत्सानंतर आम्ही याविरोधात आवाज उठविणार आहे. पोलिस प्रशासनाला मुक्तपणाने काम करता येत नाही, हे या सरकारचे दुर्दैवी आहे.
कोरेगावच्या मतदार यादीवरही आक्षेप
कोरेगाव मतदारसंघातील मतदारयादीवर माझी आजही हरकत असून साडे आठ हजार मतदारांबाबत आमचा आक्षेप आहे, असे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले, यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आपील करत आहोत.
ज्यांना लोकशाहीतून जिंकता येत नाही, ते मतदार यादी व यंत्रणेच्या माध्यमातून आमच्यावर कारवाई करत आहेत हे दुर्दैवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.