Koregaon Election News : भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार; राजकीय गणिते पूर्णपणे बदलली
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून कोरेगाव तालुक्यातील पाच उमेदवारांनी शनिवारी माघार घेतली.

Koregaon Election News – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून कोरेगाव तालुक्यातील पाच उमेदवारांनी शनिवारी माघार घेतली.त्यामुळे शनिवारअखेर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी 48 आणि पंचायत समितीच्या बारा जागांसाठी 81 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने गतिमान कार्यक्रम जाहीर केल्याने, निवडणुकीची रणनीती आखण्यात सर्वच राजकीय पक्षांची धावपळ होत आहे.या निवडणुकीत विक्रमी अर्ज दाखल झाल्याने, अर्ज माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि. 23) दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली होती.
दुसर्या दिवशी, शनिवारी वाठार किरोली गटातून भाजपच्या अनिता विकास गायकवाड, आर्वी गणातून भाजपचे दत्तात्रय शंकर यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश संपत जाधव आणि अधिक ज्ञानदेव पवार, तर ल्हासुर्णे गणातून शिवसेनेच्या रूमा विक्रम चव्हाण यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवार, दि. 27 असून, त्यानंतरच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.





