शिचियान – भारताची दोनवेळची ऑलिम्पिक पदक विजेती महिला बॅडमिंटनपटू सिंधू व स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटात प्रवेश केला.
सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बुसनान ओंग्बामुरंगचा 21-10, 21-16 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. पहिली गेम सिंधूने सहज जिंकली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये बुसनानने तिला चांगलीच लढत दिली. अर्थात बुसनानकडून झालेल्या चुकांचा सिंधूने पुरेपूर लाभ घेतला व या गेमसह सामनाही जिंकला.
श्रीकांतने सोन वान हु याच्यावर 21-12, 18-21 व 21-12 असा तीन गेमपर्यंत चाललेल्या अफलातून लढतीत पराभव केला. पहिली गेम श्रीकांतने सहज जिंकली. मात्र, दुसरी गेम त्याला गमवावी लागली. मात्र, तिसरी गेम सुरू झाल्यावर श्रीकांतने आपला खेळ उंचावला व जोरदार स्मॅशच्या जोरावर त्याने या गेमसह सामना खिशात टाकला.