कृष्णातीरावर अप्रतिम शिल्पकलेचा वारसा मिरवते आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावी असलेले हे कोपेश्वर महादेव मंदिर विशालतीर्थ म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिणेला पश्चिम वाहिनी कृष्णानदी आहे. अशा क्षेत्राला विशालतीर्थ म्हणतात. येथे पर्वकाळी स्नान पुण्यकारक मानतात.
प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्यशैलीतील हे मंदिर आहे. येथील वैशिष्ट्य् म्हणजे शिवासमोर नंदी नसून, तो यडूर या गावात आहे. मुख्य मंडप, खुला मंडप, स्वर्ग मंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे भाग आहेत. स्वर्गमंडप गोलाकार असून, बारा स्तंभावर उभा आहे. येथे कलेचा आणि सौंदर्याचा आविष्कार असलेल्या भव्य मूर्ती आहेत. मंगलमूर्ती गणेश आणि वरदहस्त शारदामूर्ती आहेत.
इंद्र, विष्णू, चामुंडा या देवतामूर्ती आपापल्या वाहनांसह या स्तंभांवर कोरलेल्या आहेत. तसेच देखणी सुरसुंदरी शिल्पे आहेत. गाभाऱ्याबाहेर विविध अलंकारांनी नटलेले जयविजय हे द्वारपाल आहेत. मात्र परकीय आक्रमणात येथील सुंदर शिल्पांचा विध्वंस केलेला दिसतो. दक्षकन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेले असे महादेव कोपेश्वर. मग समजूत काढण्याचे काम श्रीविष्णूंनी केले. त्याचे नाव धोपेश्वर.
मंदिराच्या गर्भगृहात एक कोपेश्वर आणि दुसरा थोडा उंच धोपेश्वर अशा दोन शाळुंका आहेत. दही-भातात निरसे दूध घालून पातळ करून त्याचे संपूर्ण शाळुंका, पिंडी कोपेश्वर यावर एकसारखे लेपन केले जाते. श्रीशंकर-पार्वती, गणपती, नंदी या भाताच्या मूर्तींवर नाक, डोळे रेखाटल्यावर त्या जणू संगमरवरीच भासतात.
– माधुरी शिवाजी विधाटे