अधिकाऱ्याच्या मनमानीविरोधात तहसील कार्यालयासमोर शिक्षकांचे धरणे आंदोलन
कोपरगाव – शिक्षक दिनाच्यानिमित्त गुरूजणांचे आर्शीवाद घेण्यात येतात. त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो. परंतु कोपरगावमध्ये मात्र जिल्हा परिषद शिक्षकांनी जिल्हास्तरीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शिक्षकांवर अन्याय करून मनमानी करणाऱ्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचा निषेध यावेळी करण्यात आला.
गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या अधिकाऱ्याने दिलेल्या त्रासामुळे दोन शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या जीवावर उठलेल्या या प्रभारी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांना त्वरित निलंबित करावे. किंवा त्यांची बदली करावी. जर त्यांचे निलंबन किंवा बदली नाही झाली तर तालुक्यातील शेकडो शिक्षक स्वतःची बदली करून घेण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याची माहिती शिक्षक संघटनेचे अशोक कानडे यांनी दिली. अनेक आंदोलने झाले, आक्रोश मेळावा झाला, शेकडो शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर दिले, तरीही शेख यांची कसून चौकशी केली जात नाही. किंवा त्यांची बदली केली जात नाही अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. धरणे आंदोलनाच्या वेळी विद्युल्लता आढाव म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या पोषण आहारामध्ये नजरचुकीने एखादा किडा, आळी निघाली तर शिक्षकांवर कारवाई होते. त्यांची चौकशी केली जाते. मात्र गेल्या चार वर्षापासुन प्रभारी शिक्षणाधिकारी एकाच ठिकाणी आहेत.
त्या शिक्षकांना शिस्तीच्या नावाखाली नको, त्या पध्दतीने त्रास देत आहेत. त्यांच्या जाचाला कंटाळून एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तर एका शिक्षकाने रेल्वेखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनमानी काम करुन शेकडो शिक्षकांच्या जीवावर उठणाऱ्या या शिक्षणाधिकाऱ्यांची पाठराखण केली जाते. कीड यापेक्षा शिक्षकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? माणसापेक्षा किड्या- मुंग्यांना जास्त किंमत आहे की काय अशी खंत आढाव यांनी व्यक्त करून शिक्षण विभागाच्या वरिष्ठांचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान सकाळपासुन शेकडो शिक्षक – शिक्षिका आपल्या कुटूंबासह तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. कोपरगाव पंचायत समितीचे कार्यालयीन अधिकारी पी. डी. वाघीरे, कारभारी आगवान यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. या आंदोलनामध्ये मनोहर शिंदे, रामदास गव्हाणे, प्रमोद जगताप, ज्ञानेश्वर माळवे, महेंद्र विधाते, किरण निंबाळकर, लक्ष्मीकांत वाडीले, गणेश पाचोरे, श्रीराम तांबे, ज्ञानेश्वर वाकचौरे, वसंत भातकुडव आदी शिक्षक सहभागी झाले होते.
शुभेच्छा न स्वीकारता निषेध
शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कारांचा सोहळा एका बाजूला दिमाखदार सुरू आहे तर कोपरगाव तालुक्यातील शिक्षकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रोश व्यक्त करीत धरणे आंदोलनाचा पवित्रा घेत दिवसभर कुठल्याही शुभेच्छा न स्वीकारता निषेध केले.
500 शिक्षक बदलीच्या तयारीत
शेख यांची चौकशी करून योग्य कारवाई झाली नाही किंवा त्यांची बदली नाही केली तर कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या 500 पेक्षा जास्त शिक्षकांनी सामुदायिक बदली करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.