कोपरगावला निवासी नायब तहसीलदारच नाही; चारही पदे रिक्त

इतर पदेही रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

शंकर दुपारगुडे /कोपरगाव: कोपरगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदारांसह अनेक कर्मचाऱ्यांच्या 31 मे रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बदल्या केल्या. त्यामुळे कोपरगाव तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांची शेवगावला बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर अजूनही निवासी नायब तहसीलदार नियुक्त न झाल्याने कोपरगाव तहसीलचे काम बेभरवशाचे झाले आहे. सोबत संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार बी. जी. गोसावी यांची अकोला येथे बदली झाली. निवडणूक विभागाचे नायब तहसीलदारांसह अव्वल कारकूनांची बदली झाल्याने निवडणूक विभागात एकच लिपिक आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदारांसाठीची मंजूर पदे चार असून, त्यापैकी दोघांची बदली झाली. एक नायब तहसीलदारांची कोपरगाव येथे नियुक्ती असून, ते नगर येथील निवडणूक विभागामध्ये काम करीत आहेत. पदोन्नती झालेल्या एम. पी. कुलकर्णी या एकमेव नायब तहसीलदार म्हणून तालुक्‍याचा कारभार सांभाळत आहेत. अव्वल कारकून आठ पैकी एकाची बदली झाली असून, दोन जागा रिक्त आहेत.

केवळ पाच कारकुनांवर कामकाज सुरु आहे. मंडल अधिकाऱ्यांच्या पाच पैकी कोपरगाव व दहेगाव येथे जागा रिक्त आहेत. मजूर लिपिकांची पदे 16 असून, त्यापैकी 12 कार्यरत आहेत. त्यातून दोघांची शिर्डी येथे सेवा वर्ग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दहा लिपिकांवर काम सुरु आहे. 31 तलाठ्यांपैकी 27 कार्यरत असून, त्यापैकी चार रिक्त आहेत. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांची कमतरता असणाऱ्या कार्यालयाचा पदभार देऊन तहसीलदार योगेश चंद्रे कामकाज हाकत आहेत.

दरम्यान कामकाजाला वैतागून टंचाई संकलन विभागातील कर्मचारी एम. के. उगले यांनी 30 जून रोजी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे सदर विभागात कर्मचारीच नाही. पुरवठा विभागाचे पुरवठा हिशोबी अधिकारी पी. एम पाटील हे 30 जून रोजी निवृत्त होणार असल्याने ही देखील जागा रिक्त होणार आहे. रोजगार हमी विभागातील अव्वल कारकून आर. डी. शेलार यांची श्रीरामपूर प्रांत कार्यालयात बदली झाली.

मात्र त्यांच्या जागेवरती अजून कोणीच रुजू झालेले नाही. त्यामुळे या विभागाचा कारभारही वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या बदल्या, रिक्त झालेल्या जागा, बदलीच्या ठिकाणी न आलेले अधिकारी, या सर्वांच्या गोंधळामध्ये सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याची खंत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांची बदली करून धक्का दिला आहे. सध्या तालुक्‍यात पाणीप्रश्‍न गाजत आहे. त्यातच तहसीलदार हे शासकीय किंवा वैयक्तिक कामासाठी बाहेर गेले, तर ही परिस्थिती सांभाळण्यासाठी निवासी नायब तहसीलदार हा जबाबदार अधिकारी म्हणून काम पाहत असतो. मात्र तहसीलमध्ये निवासी तहसीलदारच नसल्याने कामकाज ठराविक कर्मचाऱ्यांवरच सुरू आहे.


दाखल्यांचे काम वाढणार

बारावी व दहावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशासाठी शासनाकडून विविध दाखले घेऊन ते सादर करावे लागतात. सेतू कार्यालयातून आलेले सदरचे प्रस्ताव तातडीने मंजूर होणे गरजेचे आहे. अशातच कमी कर्मचारी असल्याने हे प्रस्ताव प्रलंबित राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.