कोपरगावला एमआयडीसी मंजूर करावी  

विवेक कोल्हे यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी

कोपरगाव –कोपरगाव मतदारसंघात व तालुक्‍यात उद्योगधंदे नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्‍न बिकट होत आहे. या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी कोपरगाव तालुक्‍यात एमआयडीसी मंजूर करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले.

याप्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, सुनील कुरकुटे, धनंजय नवले, सिद्धार्थ साठे, महेंद्र नाईकवाडे, नीलेष औताडे व संदीप खरतोडे यावेळी उपस्थित होते.कोल्हे यांनी उद्योगमंत्री देसाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव तालुका व परिसरालगत यापूर्वी साकरवाडी, लक्ष्मीवाडी व चांगदेवनगर हे तीन खासगी, तर कोळपेवाडी, संजीवनी व गणेश हे तीन सहकारी साखर कारखाने चालू होते. त्यामुळे कोपरगाव तालुका व परिसरालगत आर्थिक सुबत्ता होती. रोजगार उपलब्ध होता. परंतु नैसर्गीक आपत्तीमुळे तीन खासगी कारखाने बंद पडले. सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले व पर्यायाने रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ व परिसरालगत विविध शैक्षणिक संस्था अस्तित्वात आल्या. त्यात इंजिनिअरिंग, बी. फार्म, डी. फार्म, एमबीए, इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडत आहेत. परंतु तालुका व परिसरालगत उद्योगधंदे नसल्यामुळे सुशिक्षित युवकांपुढे बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झाले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत कोपरगाव तालुक्‍यात एमआयडीसी मंजूर होणे क्रमप्राप्त आहे.

एमआयडीसीसाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सवलती येथे उपलब्ध आहेत. त्यात शेती महामंडळाची जमीन, नव्याने होत असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, काकडी शिर्डी विमानतळ, कोपरगाव, पुणतांबा, शिर्डी रेल्वे स्टेशन, तांत्रिक, वैद्यकिय शिक्षण घेतलेले विद्यार्थी इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी संजीवनी बीपीओ कॉल सेंटर चालवीत आहे. तरीही मोठ्या प्रमाणात रोजगाराची उपलब्धता व्हावी, युवकांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी तालुक्‍यात एमआयडीसी मंजूर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.