कोपरगाव | वासुदेवाच्या वाणीतून करोनाची कहाणी सांगत कोयटेंनी केले प्रबोधन

कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव तालुक्याला करोनाने ग्रासल्याने करोनाच्या संसर्गापासून नागरीकांचा बचाव व्हावा व विनाकारण घराबाहेर कोणी फिरु नये यासाठी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी लोककलेच्या माध्यमातून नागरीकांना प्रबोधन करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली.

गेल्या अनेक पिढ्यापासुन वासुदेव रुपी सेवा करणारे सुपेकर यांच्या माध्यमातून सकाळच्या प्रहरी काका कोयटे,माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,नगरसेवक जनार्दन कदम,वैभव गिरमे यांनी सकाळच्या प्रहरी हातात बोधवाक्य लिहीले फलक घेवून वासुदेवाच्या वाणीतुन करोनाची कहाणी नागरीकांना ऐकवून करोनापासुन सुरक्षित राहण्याचे आवहान केले. 

निवारा परिसरासह शहरातील अनेक भागात घरोघरी जावून माहीपत्रके वाटत घराबाहेर विनाकारण न पडण्याचे आवहान करून स्वतःसह आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती कोयटे यांनी केली. 

वासुदेवाच्या वाणीतुन करोनाची कहाणी ऐकल्याने अनेकांना आश्चर्य वाटत होते तर वासुदेव नेहमी पांडुरंगाचे नामस्मरण करणारे मात्र आजच्या सकाळी आपल्या दारात करोनाची कहाणी सांगत असल्याचे पाहुन अनेकांना करोनाचे घातक रुप देवाच्या तोंडून सांगितल्याचा भास होत होता.

अनोख्या प्रबोधना बद्दल बोलताना काका कोयटे म्हणाले की, करोनाने सर्वांना ग्रासलेले आहे. अनेकांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत.या महासंकटातून नागरीकांना वाचण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करीत आहे मात्र नागरीक खुलेआम घराबाहेर पडत आहेत.

निष्काळजी राहून करोनाचा संसर्ग वाढवित असल्याने लोककलेच्या माध्यमातून जनतेला भावनीक,अध्यात्मिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव म्हणजे देवाचे रुप समजले जाते त्याच वासुदेवाच्या वाणीतुन करोनाची कहाणी सकाळी सकाळी दारात ऐकवल्याने नागरीकांचे प्रबोधन झाल्याचे समाधान आहे.या प्रबोधनातुन अनेकांचा जीव वाचला तर त्याचे खरे समाधान मला होईल असेही शेवटी कोयटे म्हणाले.

आपल्या प्रभागातील नागरीकांना कायम सतर्क राहण्याचे आवहान करुन प्रभाग करोनामुक्त करण्यासाठी नगरसेवक जनार्दन कदम सतत प्रयत्नशील असतात.कदम यांनी वासुदेवाची प्रभात फेरी काढून सर्वांचे लक्ष वेधले त्यांना नगरसेविका दिपाली गिरमे,वैभव गिरमे यांचे सहकार्य लाभले तर समता पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी या अभियानात मोलाचे सहकार्य केले. कोयटे यांच्या वासुवदेव वाणीची सर्वत्र चर्चा रंगली होती.

वासुदेवाची ऐका वाणी
करोनाची रे सांगतो कहाणी.
शासकीय यंत्रणा करती सेवा
तोंडाला तूम्ही मास्क लावा.
करोनावर आहे सोपा उपाय
सॅनिटायझर लावू स्वच्छता राखा असा उपदेश वासुदेव करीत होते
वासुदेवाची ऐका वाणी
करोनाची रे सांगतो कहाणी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.