गेल्या 15 वर्षांत समाजहित आणि सामाजिक बांधिलकीची जोड देत नगरसेवक चंद्रकांत मळेकर यांनी भोर शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. दोन भावांच्या पाठबळावर आणि नागरिकांच्या सहकार्याने विकासकामे आणि समाजहित जोपासले आहे. कोविडच्या काळात त्यांनी झोकून देऊन काम केले आहे. तरूणाई, ज्येष्ठ नागरिक, सर्व घटकांतील वर्ग यांच्यात समन्वय साधत मळेकर यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा…
नगरसेवक चंद्रकांत अनंता मळेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून शहरात आपली ओळख निर्माण केली आहे. एमएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 12 वर्षे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर नऊ वर्षे पान स्टॉलचा व्यवसाय सांभाळला. त्यांना उपजत सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी कुटुंबांच्या आणि तरुणांच्या पाठबळावर 2018 ते 19 मध्ये भोर नगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यांनी प्रभाग एकमध्ये विजय मिळविल्यानंतर त्यांच्या कार्याचे पैलू उलगडत गेले.
भेलकेवाडी, भोरेश्वरनगर, पिराचा मळा, विठ्ठल मंदिर, परीट आळी हा भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तारलेल्या प्रभागात आपली विकासात्मक छाप सोडली आहे. त्यांनी शिवशाही ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंती सोहळ्यात सहभाग घेत तो यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसविण्याचे काम केले. यातील एक काम प्रस्तावित आहे. तसेच रायगड राज्याभिषेक सोहळ्यात सहभाग घेतला आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्यवाटप, मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, वनवासी कल्याण आश्रमशाळामध्ये कपडे वाटप केले. त्यांनी जिल्हा पातळीवर क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ते दोन वर्षांपासून भोर प्रीमीअर लीगचे सामने भरवित आहेत. करोनाच्या काळात गरजूंना किट वाटप केले. त्यांनी पदरमोड करून रुग्णांची तपासणी केली. उपचारासाठी मदत, औषधे पुरवली. पोलीस, नगरपालिका, तहसील प्रशासनाला मदत करून वंचित घटकांना न्याय दिला. मळेकर हे लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये रात्री 11 ते पहाटे साडेपाचपर्यंत कोविड सेंटरला भेटी देत रुग्णसेवा केली. 22 वर्षांच्या मुलाचा अंत्यविधी करून माणुसकीची प्रचिती दिली. शेतमजूर महिला प्रसूतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर तिला घरी जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यावेळी तिला मदत केली.
विकासकामे करताना संपूर्ण प्रभागाचा समतोल साधून विकासकामे केली आहेत. त्यांनी दोन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. प्रभागात रस्ते, ड्रेनेज लाइनची कामे मार्गी लावली. वीस वर्षांपासून सुविधा नसलेल्या भागात त्यांनी विकासकामे केली आहेत. दिवाबत्तीची सोय केली. भोरेश्वरनगरमध्ये सहा इंची पाइपलाइन पूर्ण केली. महिला बचत गटाच्या माध्यमातून 50 जणांना रोजगार वाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.
माजी मंत्री अनंतराव थोपटे (साहेब), आमदार संग्रामदादा थोपटे, नगराध्यक्षा निर्मलाताई आवारे, नगरसेविका पद्मिनीताई तारू, गटनेते सचिन हर्णसकर, दिवंगत वडील अनंता मळेकर यांचे आशीर्वाद, आई शकुंतला मळेकर, बंधू भालचंद्र मळेकर, बंधू दशरथ मळेकर यांच्या पाठबळावर मळेकर यांचा सामाजिक, राजकीय प्रवास उन्नतीच्या वाटेवर सुरू आहे. त्यांचे लोकांप्रती असलेले समाजभान प्रभागासाठी आदर्शवत आहे.
नगरसेवक मळेकर हे करोना साथीच्या काळात भोर शहरवासियांसाठी खऱ्या अर्थाने करोना योद्धा ठरले आहेत. नगरसेवक मळेकर यांनी जबाबदारी पेलून समाजाशी नाळ जोडली आहे. त्यांची वाटचाल भोर शहरासाठी दिशादर्शक ठरत आहे.
शब्दांकन:
भुजंगराव दाभाडे