पुणे – वीजबिल थकल्याने कनेक्शन कट केल्याच्या रागातून महावितरणच्या कर्मचाऱ्याला “मीटर पुन्हा लाव’ असे म्हणत घरामध्ये कोंडून ठेवणाऱ्या एकाला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.
सलीम बशीर सय्यद (41, रा. मंगळवारपेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत माधुरी कुलसंगे (28, रा. मंगळवारपेठ) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी या थकित विद्युत बिलाच्या यादीतील वीजबिल ग्राहक सलिम सय्यद यांचे 11 हजार 481 इतके बिल थकित होते. त्यांनी ते न भरल्याने त्यांचे वीज कनेक्शन कट केले होते.
यावरून सलीम सय्यद याने चिडून जाऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावत जाऊन कट केलेली लाईट सुरू कर म्हणत रुममध्ये कोंडून ठेण्याची धमकी दिली. फिर्यादी या मीटर रुमधून त्यांना समजावून सांगत असताना सय्यद याने मीटर रुमची बाहेरून कडी लावून फिर्यादींना कोंडून ठेवले.
दरम्यान, फिर्यादींनी त्यांच्या कार्यालयातील सहायक शैलेश धुमाळ यांना फोन करून बोलवून घेतले. ते आल्यानंतर त्यांनादेखील सय्यद याने शिविगाळ केली. तसेच, ते करत असलेल्या कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.