बंगळुरू – आंद्रे रसेलने 13 चेंडूत सात षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद 48 धावांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 चेंडू आणि 5 गडी राखून पराभव करत आगेकूच नोंदवली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 205 धावांची मजल मारली.
प्रत्युत्तरात खेळणाऱ्या कोलकाताने धमाकेदार सुरुवात केली. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात नारायण दुसऱ्या षटकांत बाद झाला. त्यावेळी कोलकाताने 28 धावांची मजल मारली होती. यानंतर ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी 8 षटकांत 63 धावांची भागीदारी केल्यानंतर उथप्पा 33 धावा करत कोलकाताला शतकी वेस ओलांडून दिल्यानंतर लिन 43 धावावर परतला. यानंतर नितीश राणा आणि कार्तिकने फटकेबाजी केली. मात्र, धावा आणि चेंडूमधील अंतर कमी करण्याच्या नादात हे दोघे बाद झाले. कोलकाताला विजयासाठी 3 षटकांत 53 धावांची गरज असताना आंद्रे रसेलने फटकेबाजी करत हे लक्ष्य 5 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या बंगळुरूच्या सलामीवीरांनी पहिल्याच षटकापासून फटकेबाजीला सुरुवात करत पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये 53 धावांची मजल मारून दिली. पॉवरप्लेच्या षटकांनंतर पार्थिव पटेल 25 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या डीव्हिलियर्सला साथीत घेत कोहलीने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. यावेळी विराटने फटकेबाजी करत केवळ 31 चेंडूंमध्येच अर्धशतक पूर्ण करून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने सुरेश रैनाचा 5086 धावांचा टप्पा ओलांडला.
कोहली आणि डीव्हिलियर्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत बंगळुरूला 15 षटकांत 1 बाद 142 धावांची मजल मारुन दिली. मात्र, आणखीन फटकेबाजी करण्याच्या नादात कोहली 84 धावा करून बाद झाला. तर डीव्हिलियर्सही 63 धावा करून परतल्यानंतर मार्कस स्टोइनिसन बंगळुरूला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला.