मोहाली – ख्रिस लिन, शुभमन गिल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा सात गडी आणि बारा चेंडू राखून पराभव करत बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 183 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना कोलकाताने हे आव्हान 18 षटकांत केवळ तीन गडी गमावून पूर्ण करत आगेकूच केली. या पराभवाने पंजाबच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
प्रत्युत्तरात खेळताना कोलकाताने धमाकेदार सुरुवात केली. पहिल्याच षटकापासून त्यांनी दहाच्या सरासरीने धावा करायला सुरुवात केली. 5.1 षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लगावले. यावेळी ख्रिस लिन 46 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाने वेगवान 22 धावांची खेळी साकारत गिलच्या साथीत संघाला शंभरी ओलांडून दिली. यावेळी दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या गिलनेही फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला.
तर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आंद्रे रसेलने 24 धावांची स्फोटक खेळी करत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. मात्र, तो बाद झाल्यानंतर गिल आणि कार्तिक यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. यावेळी गिलने नाबाद 65 धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबची सुरुवात खराब झाल्यानंतर आलेल्या निकोलस पुरण (48), मयंक अग्रवाल (36), मनदीप सिंग (25) आणि अखेरच्या काही षटकांमध्ये सॅम करण याने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर 183 धावांची मजल मारली. यावेळी सॅम करणने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी साकारली.