कोरोना रुग्णांची अवाजवी बील आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई- जिल्हाधिकरी दौलत देसाई

 

 

कोल्हापूर: कोरोना रुग्णांच्या उपचाराची अवाजवी बील आकारणी करुन पिळवणूक करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर निश्चित कारवाई केली जाईल. नोंदणी रद्द करण्याची कारवाईही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. देसाई पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिक आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 प्रादूर्भाव वाढत आहे. दररोज 250 ते 350 रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांकडे कलही वाढत आहे. शहरातील 25 खासगी रुग्णालये सेवा देत आहेत. परंतु, काही रुग्णालयांकडून रुग्णांसाठी अवाजवी बील आकारणी केली जात आहे. अशावेळी या रुग्णांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकास्तरावर प्रत्येक रुग्णालयासाठी लेखा परीक्षण अधिकारी नेमण्यात आला आहे.

रुग्‍णांना दिलेले बील हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार आहे की नाही, हे हा अधिकारी तपासणी करेल. योग्य बील असल्यास तेवढेच बील रुग्णालयाला द्यावे. उर्वरित बील रुग्णांनी देवू नये, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णांनी त्यासाठी या लेखा परीक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क करुन तक्रार करावी. अवाजवी बील आकारणी केल्याचे आढळल्यास अशा रुग्णालयांवर निश्चित कारवाई केली जाईल. रुग्णालयाची नोंदणी देखील रद्द केली जाईल, याची सर्व खासगी रुग्णालयांनी नोंद घ्यावी. अशीच कार्यपध्दती ग्रामीण भागात जिथे मोठी रुग्णालये आहेत, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, शिरोळ या ठिकाणीही खासगी रुग्णालये अवाजवी दर आकारणी करत असतील तर तेथेही लेखा परीक्षण अधिकाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक करुन या बिलांवर नियंत्रण ठेवले जाईल.

जिल्ह्यात कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव वाढत असला तरी जवळपास 90 ते 95 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. अशा रुग्णांनी रुग्णालयाकडे न जाता, कोणाशी संपर्कात न येता घरात स्वतंत्र राहिल्यास, अशांसाठी जिल्हा परिषद, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत कोव्हिड किट दिले जाईल. या किटचा कसा वापर करायचा याचेही मार्गदर्शन केले जाईल. अशा रुग्णांनी स्वत:ला घरी विलगीकरण करावे. त्यामुळे कोव्हिड काळजी केंद्रावर भार येणार नाही. अशांसाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून योग्य तो वैद्यकीय सल्ला दिला जाईल. यामुळे रुग्णालयांवर येणारा भार कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.