कोल्हापूरात वंचितची प्रस्थापितांना धडकी

मातब्बर उमेदवारांना वंचित ची धास्ती
कोल्हापूर: मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदार ही कॉंग्रेसची पारंपारिक व्होट बॅंक मानली जाते. या हुकुमी मतदारांसह बहुजन समाजातील विविध घटकांना वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मिळवलेली मते आणि विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या यामुळे प्रस्थापितांना धडकी भरत आहे. वंचितला सक्षम उमेदवार मिळाल्यास युती व दोन्ही कॉंग्रेस समोर तगडे आव्हान उभे राहू शकते.

वंचितने लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात मिळून 1 लाख 86 हजार 858 मते मिळवली. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अरुणा माळी यांना 64 हजार 439, तर हातकणंगले मतदारसंघात अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 419 मते मिळाली. वंचितने विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंडळीही वंचितच्या संपर्कात आहेत. वंचित आघाडीचे नेते आंबेडकर यांनी ‘कॉंग्रेसमधील नाराज, बिगर नाराज सगळेच आमच्या संपर्कात आहेत. आणि चर्चेसाठी आमचे दरवाजे खुले आहेत, असे जाहीर करून इतरांना साद घातली आहे.

72 इच्छुकांच्या मुलाखती
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती झाल्या. दहा ठिकाणी मिळून 72 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये कोल्हापूर उत्तरमध्ये नऊ, कोल्हापूर दक्षिणमध्ये आठ, चंदगडमध्ये सात, शाहूवाडीत सहा, करवीरमध्ये सात, हातकणंगलेत 14, राधानगरीत तीन, कागलमध्ये सहा आणि शिरोळमध्ये नऊ जणांनी उमेदवारी मागितली आहे. हातकणंगले तालुक्‍यात सर्वाधिक 14 उमेदवार वंचितच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. त्या पाठापोठ कोल्हापूर उत्तर, दक्षिण, शिरोळमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांनी वंचितकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×