कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी सकाळी 10 वाजता अवघे कोल्हापूर 100 सेकंदासाठी स्तब्ध झाले. गतवर्षी प्रमाणे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्याचे स्मरण केले.
शाहू स्मृती स्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले.
याठिकाणी विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. याठिकाणी शाहूंप्रेमींनी दिलेल्या श्री शाहू महाराज की जय ..! या जयघोषाने समाधी स्थळ परिसर दुमदुमून गेला.
सकाळी ठिक 10 वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जागेवर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बॅंकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.