कोल्हापूर – पुणे- बेंगलोर महामार्गालगत टोपजवळील जाजल पेट्रोल पंपावरील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ४ अज्ञात दरोडेखोरांनी २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना आज सोमवारी पहाटे घडली. याबाबत जगदीश कांबळे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जाजल पेट्रोल पंपावरील कर्मचारी जगदीश व्यंकटराव कांबळे (रा. खुपीरे, ता. करवीर) आणि कुमार वघरे (रा. सोनवडे, ता. शाहूवाडी) हे दोघे पंपाच्या ऑफिसमध्ये झोपले होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास याठिकाणी चार दरोडेखोर आले आणि त्यांनी कांबळे आणि वघरे यांना चाकू, सुरा, कटावणी या हत्यारांनी धाक दाखवला. तसेच दोघांनाही लाथा बुक्क्यानी जबर मारहाण केली. आणि ऑफिसच्या लॉकरमधील आणि त्यांच्याकडील बॅगेतील २ लाख ५० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल संच असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. अधिक तपास स. पो. नि. राजेश खांडवे करीत आहेत.