कोल्हापूर : 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची माहिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढता संसर्ग आणि उपलब्ध खाटांची व्यवस्था लक्षात घेवून यापैकी काही खाटांचे आयसीयू बेडमध्ये रुपांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड नवीन बेड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

यामध्ये सीपीआर, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, संजय घोडावत विद्यापीठ, इएसआयएसएच, ग्रामीण रुग्णालय पारगाव किंवा एमजीएम हे खासगी रुग्णालय याठिकाणी हे आयसीयू बेड तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधा आणि मनुष्यबळासाठी खासगी संस्थेकडून निविदा मागविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालय निहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तीन अधीक्षक अभियंता, वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सुविधा येत्या दहा ते बारा दिवसात पूर्ण होतील, असा विश्वासही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. अनिता सैबन्नावर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारे विभागाचे महेश सुर्वे, महावितरणचे सागर मारुलकर, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.