कोल्हापूर- शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना टेंबलाईवाडी परिसरात घडली. याप्रकरणी विकी बबन कवाळे (रा. दुसरी गल्ली, राजारामपुरी) याच्यासह सहा जणांविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी कवाळेसह विशाल कवाळे, रेखा कवाळे, मीना खिल्लारी, संजय कवाळे, बबन कवाळे (रा. राजारामपुरी) अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
रस्त्याने जाणाऱ्या ओळखीच्या तरुणीला विकी कवाळे याने लग्नाबाबत बोलायचे आहे, असे सांगून तिला जबरदस्तीने रिक्षातून टेंबलाईवाडी परिसरात नेले. तेथे तिला शीतपेय देण्यात आले. थोड्या वेळात तिला गुंगी आली. त्यानंतर जवळील बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात संशयिताला पाच जणांनी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपासाधिकारी सुनील पाटील यांनी सांगितले.