कोल्हापूर (प्रतिनिधी) :- शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये चार टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा 66 वा रविवार असून या अभियानामध्ये जेष्ट नागरिक, स्वरा फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगांवकर व कार्यकर्ते, वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे व कार्यकर्ते, उपाध्यक्ष उत्तम पाटील, राज कोरगावकर, प्रथमेश सुर्यवंशी, प्रेम कदम, संतोष घाटगे, मनोज कोळी व कार्यकर्ते, स्वच्छता दूत अमित देशपांडे व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंस ठेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था तर्फे साईक्स एक्सटेन्शन परिसरामध्ये अत्यंत दुर्मिळ आणी औषधी वनस्पतींचे उप महापौर संजय मोहिते यांच्या हस्ते वक्षारोपण केले. या वृक्षारोपनामध्ये प्रामुख्याने बिक्सा, जंगली बदाम, पायर, गुळभेंडी, टेंबू बिया रोझिया, करंज, कांचन अशा झाडांचा समावेश होता. वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था अध्यक्ष अमोल बुड्डे, गार्डन विभागचे नेत्रपाल जाधव, सतिश कोरडे, अक्षय कांबळे, तात्या गोवावाला, सचिन पोवार व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. तसेच वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था तर्फे रुईकर कॉलनी मैदान येथील झाडांना पाणी घालून सभोवतालची स्वच्छता करण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते यांना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
याचबरोबर कसबा बावडा झूम प्रकल्प परिसरात हवा शुध्द ठेवणारी विषारी वायू शोषून घेणा-या झाडांचे वृक्षारोपन केलेले आहे. त्या झाडाला पाणी घालून त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी विभागीय आरोग्य निरिक्षक निखील पाडळकर, किटकनाशक अधिकारी स्वप्नील उलपे, आरोग्य विभागाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
सदरची स्वच्छता मोहिम पंचगंगा नदी घाट व पंचगंगा स्मशानभूमी, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज मेनरोड, हॉकी स्टेडियम ते शेंडा पार्क, रंकाळा टॉवर ते डी मार्ट मेनरोड, जयंती नदी संप व पंप हाऊस परिसर, रंकाळा तलाव मेनरोड, रिलायन्स मॉल मागील बाजू जयंती नदी, धैर्यप्रसाद हॉल ते कावळा नाका ते मध्यवर्ती बसस्थानक, सर्किट हाऊस ते कसबा बावडा तसेच क्रशर चौक ते देवकर पाणंद व सानेगुरुजी वसाहत रोड, कोटीतीर्थ तलाव परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. यावेळी नागरीकांना मास्कचा वापर करावा, सर्वांनी वारंवार हात स्वच्छ साबनाने धुवावे, गर्दीमध्ये जाऊ नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन स्वच्छता मोहिमेच्या वेळी करण्यात आले.
या मोहिमेत 4 जेसीबी, 4 डंपर, 6 आरसी गाडया, 4 औषध फवारणी टँकर, 1 वॉटर टँकर वापर करण्यात आली. तसेच महापालिकेच्या 70 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली.यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.