कोल्हापूर – कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेस आमदार पी. एन. पाटील, यांची उपस्थिती होती.
विधान परिषद कोल्हापूर स्थानिक प्राधिकारी व्दिवार्षीक निवडणुकीसाठी एकूण ४१६ पैकी २७० मतांचा पाठिंबा पालकमंत्री सतेज पाटील यांना आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी सतेज पाटील म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीतर्फे मी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. यामुळे गेल्या वेळपेक्षा आताची निवडणूक माझ्यासाठी सोपी आहे. सध्यस्थितीत मला २७० मतदारांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे विजय निश्चित आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांचा विजयाची फक्त औपचारिकता बाकी असून त्यांचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.