कोल्हापूर(प्रतिनिधी) -जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पाच वाजण्याच्या सुमारास उघडले असून त्यातून 7112 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीची पातळी वाढली असून कोणत्याही क्षणी पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. गेले दोन दिवस अधून मधून पावसाच्या सरी पडत होत्या. पण सोमवारी सकाळपासून घाटमाथा आणि धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली तर राधानगरी धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाटगाव, तुळशी धरण भरले असून धरणातील पाणी सोडले जात आहे. आज सोमवारी सायंकाळी राधानगरी धरणाचे स्वयंचलित धरणाचे गेट क्रमांक तीन, चार, पाच, सहा उघडले असून त्यातून 7112 क्युसेक पाण्याचा प्रवाह बाहेर पडत आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नद्यांना पूर आला आहे. कासारी नदीचे पाणी चौथ्यांदा बाहेर पडले आहे.
कोल्हापूरातील कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी 28 फूट नऊ इंच इतकी पोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. पंचगंगा नदीचे पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.