कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात ऐतिहासिक, प्राचीन, नैसर्गिक व आधुनिक पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या पर्यटन स्थळांसोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, क्रीडा, कला, उद्योग, कृषी व सामाजिक क्षेत्रांत केलेल्या कामाची माहितीही येथे येणाऱ्या पर्यटकांना द्यावी.
प्रशासनाने येथील पर्यटन स्थळांची माहिती योग्य पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविल्यास ‘कोल्हापूर जिल्हा पर्यटन’ आता देश पातळीवर ‘नंबर एक’चा जिल्हा होईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दिनांक 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोल्हापूर जिल्हा पर्यटन सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनात प्रचंड संधी आहे. जागतिक स्तरावर पर्यटनातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाचे ब्रॅण्डिंग करून कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक विविध ऐतिहासिक, नैसर्गिक व आधुनिक पर्यटन स्थळे पाहण्यासाठी यावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ चे ब्रॅंडिंग करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.