कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; तीन दिवस कामकाज बंद

 

कोल्हापूर- कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाचा कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे. ही माहिती समजताच गुरुवारी सकाळी पुरवठा विभाग सील करण्यात आला आहे.या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना रुग्ण आढळल्याने अन्य सर्व विभागात काळजी घेण्यात आली असून बहुतांशी सर्व विभागांमध्ये नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या पुरवठा विभागातील मंडल अधिकाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे या कार्यालयातील कामकाज तीन-चार दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांपुर्वीच शाहुवाडी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी पॉझीटीव्ह आल्यानंतर हे संपूर्ण कार्यालयाच क्वॉरंटाईन करावे लागले होते, तशीच स्थिती पुरवठा विभागात झाली आहे. घसादुखी आणि श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुरवठा विभागातील या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपुर्वी स्वॅब तपासणीसाठी दिला होता. रात्री उशीरा त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला.

त्यामुळे त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांच्या तीव्र संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही तातडीने सीपीआरमध्ये आणून त्यांचेही स्वॅब घेण्यात आले. थेट कार्यालयातूनच हे अधिकारी स्वॅब तपासणीसाठी गेले होते. त्यामुळे कार्यालयातही त्यांचा काहीशी संपर्क आला असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल आल्यानंतर पुरवठा विभागात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून हे कार्यालय तीन-चार दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.