कोल्हापूर – काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी साधारण ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेल आणि कनेक्टिव्हिटीसह उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी करुन उर्वरीत अपूर्ण कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, तहसीलदार मीना निंबाळकर, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, सहाय्यक अभियंता हेमंत जाधव, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, गटविकास अधिकारी संदीप भंडारी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी या योजनेच्या जॅकवेलच्या कामाची आणि इंटेकवेलच्या कामाची माहिती घेऊन आढावा घेतला. इंटेकवेलमध्ये सध्या धरणातील पाणी आल्याने याचे डीवॉटरिंग करण्यासंदर्भातही पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती घेतली.
जॅकवेल आणि कनेक्टिविटीचे काम पूर्ण करण्याबरोबरच या योजनेचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून काम पूर्ण करावे, अशी सूचना पाटील यांनी केली. आजपर्यंत काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे एकूण ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम एप्रिल अखेर पूर्ण होण्यासाठी नियोजन करा व त्यानंतर इंटेकवेलचे काम पूर्ण करा. तसेच त्यानंतर योजनेच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यासाठी नियोजन करावे, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी प्रकल्प अभियंता राजेंद्र माळी यांनी डिसेंबर महिन्यात देखील पाऊस झाल्यामुळे कॉपर डॅम फुटल्याने इंटेकवेल पाण्याने भरला असून इंटेकवेलचे डीवॉटरिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. इंस्पेक्शनवेलचे काम पूर्ण झाले असून जॅकेवेलचे ६ मीटरचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे काम ७५ टक्क्यांहुन अधिक झाले आहे. तर या योजनेच्या एकूण ५२.९७ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याच्या कामापैकी ५१.२ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणचे २७ किलोमीटर पैकी १७ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.