कोल्हापूर | “पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्तीचा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून”

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

कोल्हापूर – ‘भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी अध्यक्ष आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचा प्रकार हा लोकशाहीचा खून केल्यासारखा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागणार आहोत’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने दोनच दिवसापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली होती.भाजप-शिवसेना सरकारच्या कालावधीत ऑगस्ट २०१७ मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासह सहा जणांचा समावेश असलेली समिती नुकतीच बरखास्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. पाटील म्हणाले, ‘सरकार मनमानी व हम करे सो कायदा या पद्धतीने वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल अजून एक वर्ष ते सव्वा वर्षे शिल्लक होता. कार्यकाल संपण्यापूर्वीच सरकारने समिती बरखास्त केली आहे. हे चांगल्या कामकाजाचे लक्षण नव्हे.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असताना मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यरत होते. म्हणून भाजपाने सिद्धीविनायक मंदिराची समिती काही बरखास्त केली नव्हती. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यावर नवीन नियुक्त्या केल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारने मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करुन लोकशाहीचा खून केला आहे.’

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.