कोल्हापूर( प्रतिनिधी) – होमगार्ड म्हणून ३ वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टीफिकेट मिळवून देण्याकरीता २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी दोघा होमगार्डवर कोल्हापूर लाचलुचपत विभागाने आज कारवाई केली. अनिकेत संताजी सरनाईक, (वय २३, होमगार्ड- सनद नं. १२४१, कोल्हापूर शहर पथक, रा. शाहु कॉलनी प्लॉट नं. ६, मंगळवार पेठ, कोल्हापूर), निलेश विठ्ठल सुतार (वय २६, होमगार्ड- सनद नं . १५ ९ ३, कोल्हापूर शहर पधक, रा. श्री. महेकर यांचे घरी भाडयाने, हनुमान गल्ली, टेंबलाईवाडी, ता. करवीर) अशी त्या दोघांची नावे आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तकारदार हा होमगार्ड असून, त्याला त्याच्या खात्याकडून होमगार्ड म्हणुन ३ वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टीफिकेट व पुर्ननियुक्तीसाठी रितसर फॉर्म भरून कागदपत्रे सादर करणेबाबत कळविले होते. त्याप्रमाणे त्यांने आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म भरून कार्यालयात सादर केला होता. त्यांनतर जुना राजवाडा पोलीस ठाणे इमारतीमधील होमगार्ड कार्यालयातील कार्यालयीन कामकाज करणारे होमगार्ड अनिकेत सरनाईक व निलेश सुतार या दोघानी त्यांच्याकडे होमगार्ड म्हणून ३ वर्षे उत्कृष्ट सेवा सर्टीफिकेट मिळवून देणेसाठी यांचेकडे २ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याबाबत १७ जुलैला कोल्हापूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार देण्यात आली होती.
या तक्रारीप्रमाणे दोन पंच साक्षीदारांच्या समक्ष जुना राजवाडा पोलीस ठाणेच्या इमारतीसमोर होमगार्ड अनिकेत सरनाईक व निलेश सुतार यांच्याकडे लाच मागणीबाबत पडताळणी केली. त्यामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाणे इमारतीमधील होमगार्ड कार्यालयात काम करणार होमगार्ड अनिकेत सरनाईक व निलेश सुतार यांनी तकारदार यांना होमगार्डमध्ये ३ वर्षे उत्कृष्ठ सेवा बजावलेबाबत सर्टिफिकेट मिळवून देणेसाठी त्यांचेकडुन २ हजार ५०० रुपयांची लाच मागणी करून ती लाच रक्कम घेवून येताना फोन करून जेथे असेल तेथे येण्यास सांगितलेचे निष्पन्न झाले आहे.
त्याबरोबरच १७ जुलैला सापळा रचून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यानी कारवाईचे आयोजन केले. पण याचवेळी होमगार्ड निलेश सुतार यांनी तकारदार यांना २० जुलै रोजी जिल्हा होमाई प्रशिक्षण केंद्र येथे येवून भेटणेस सांगितले. त्यामुळे सदरची कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली. त्यानंतर २० जुलै रोजी होमगार्ड अनिकेत सरनाईक व निलेश सुतार यांचे लाच मागणीप्रमाणे सापळा कारवाई आयोजित केली असता, दोघांनीही तक्रारदाराकडून पैसे स्विकालेले नाहीत. पण या दोघांनी लाचेची मागणी केल्याचे उघड झाल्याने त्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पो. हे.कॉ. मनोज खोत, पो.ना. विकास माने व नवनाथ कदम, पो. कॉ. मयुर देसाई आदीच्या पथकानी केली आहे.