कोल्हापूर : कोल्हापुरातील गांधीनगर पोलिस ठाण्यामधील एपीआय, पीएसआय आणि काॅन्स्टेबलविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला आयशर टेम्पो परत देण्यासाठी आयशर मालकाच्या मित्राकडून 50 हजारांची लाच त्यांनी मागितली. दोन अधिकारी आणि पोलिस शिपायावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक शंकर जाधव (वय 44 वर्षे), पोलीस उप निरीक्षक आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलिस काॅन्स्टेबल संतोष बळीराम कांबळे (वय 33 वर्षे) यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार आणि त्यांचा मित्र जनावरे यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदारासह त्यांच्या साथीदारावर गांधीनगर पोलीसात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात तक्रारदाराचा आयशर टेम्पो आहे. तक्रारदार जप्त केलेला टेम्पो सोडण्यासाठी आणि कोर्टात म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगीरे यांनी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. तसेच त्यांच्या सहकाऱ्याला दिपक जाधव यांनी फोन करून गुन्ह्यात मदत करतो म्हणत 35 हजारांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलूचपतकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता तडजोडीअंती 50 हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.