कोल्हापूर, सांगलीतील जनजीवन पूर्वपदावर

डॉ. दीपक म्हैसेकर : सानुग्रह अनुदानापोटी 16 कोटींचे वाटप

पुणे -पूरग्रस्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पुराची स्थिती निवळली असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू असून पुणे विभागातील 33 हजार 775 पूरग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदानापोटी 16 कोटी 88 लाख 75 हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील बाधित कुटुंबांना 10 हजार तर शहरी कुटुंबांना 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरूपात बाधित कुटुंबाला वाटण्याचे काम सुरू असून उर्वरित रक्‍कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 कोटी 1 लाख 80 हजार रुपये, सांगली जिल्ह्यात 7 कोटी 21 लाख 25 हजार, सातारा जिल्ह्यात 28 लाख 30 हजार, पुणे जिल्ह्यात 17 लाख 50 हजार तर सोलापूर जिल्ह्यात 19 लाख 90 हजार रुपयांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील 23 हजार 889 कुटुंबांना गहू व तांदुळ वाटप करण्यात आले आहे. पूरामुळे विभागातील एकूण 54 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर 10, सातारा 8, पुणे 9 तर सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्‍तीचा समावेश आहे. विभागातील 4 लोक बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे.

सांगली जिल्ह्यात 104 गावे बाधित
सांगली जिल्ह्यामध्ये 4 तालुक्‍यांतील 104 गावे बाधित झाली असून यामधील 69 हजार 67 कुटुंबांतील 3 लाख 11 हजार 220 व्यक्‍ती सध्या स्थानांतरित आहेत. या स्थानांतरित व्यक्‍तींसाठी 138 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्‍यांतील 321 गावे पूरामुळे बाधित झालेली असून स्थानांतरित व्यक्‍तींची संख्या 3 लाख 58 हजार 91 इतकी आहे व त्यांच्यासाठी 224 तात्पुरते निवारा केंद्र सुरू आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या 11 असून या व्यतिरिक्‍त 1350 घरांची अंशत: पडझड झालेली आहे. कोल्हापूरमध्ये पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या 496 असून या व्यतिरिक्‍त 8 हजार 478 घरांची अंशत: पडझड झालेली आहे. तसेच 316 गोठ्यांची पण पडझड झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)