कोल्हापूर – कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान शनिवारी रात्री बिंदू चौक सबजेलमधील तब्बल ३१ बंदीजंनाना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने कारागृहात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सदर कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला हादरा बसला आहे.
५ एप्रिल रोजी या कारागृहातील दोन कैंद्याना शाहूपुरी पोलीस ठाण्याअंतर्गत तपासणीसाठी इचलकरंजीला नेण्यात आले होते. त्यामुळे परत कारागृहात येताना यांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एका कैद्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ८२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली.
याचा अहवाल शनिवारी रात्री कारागृह प्रशासनाला प्राप्त झाला. यामध्ये तब्बल ३१ कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. तर ५१ जणांचे निगेटिव्ह आले आहेत. संबंधित कोरोना रुग्णांवर कारागृहातच कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती कारागृह अधिक्षक विवेक झेंडे यांनी दिली आहे.