कोळगाव : जिल्हाधिकार्‍यांनी केली तहसीलदारांची कानउघाडणी

कामाची पद्धत सुधारण्याचा सल्ला ; कोळगावच्या आरोग्य उपकेंद्राला दिली अचानक भेट

श्रीगोंदा : कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आरोग्य उपकेंद्राला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी अचानक भेट दिली. तेथे कोविडच्या नोंदी न सापडल्याने जिल्हाधिकारी संतापले. अश्यातच श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार समोरून येताच जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेत कानउघाडणी केली. कामाची पद्धत सुधारण्याचा सल्ला दिल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आरोग्य उपकेंद्रास रविवारी जिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी अचानक भेट दिली. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी मात्र गायब होते. शिवाय तेथे कोविड 19 बाबतच्या नोंदी उपलब्ध नसल्याने भोसले संतप्त झाले. तेवढ्यात समोरून तहसीलदार प्रदिप पवार आले. माझी अचानक भेट असताना आपल्याला कुठून समजले मी येतोय, कामात तत्परता दाखवा, करोनात लोकांना मदत करा, असे खडे बोल त्यांनी पवार यांना सुनावले. त्यावर आम्हीही भेटी देतोय असा पवार यांनी केलेला दावा त्यांनी खोडून काढला. हा योगायोग नाही, आपण करोनातील कामात लक्ष द्यायला हवे, असे म्हणत जेथे चांगले काम आहे तेथे तरी घेऊन चला, असे जिल्हाधिकार्‍यांनी पवार यांना सांगितले.
यावेळी काही नागरिक करोना तपासणी करण्यासाठी आले होते. तेथे प्रमुख कोणीही नसल्याने सगळा गोंधळ जिल्हाधिकारी यांच्या समोरच उडाला. येथील कोविड सेंटरची भोसले यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड, बाळासाहेब नलगे, माजी उपसरपंच मधुकर लगड, अमित लगड आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.