योगगुरू रामदेवबाबांची कोलांटउडी; म्हणे, डॉक्‍टर देवदूत…

म्हणून उल्लेख

डेहराडून – योग आणि आयुर्वेदाचे संरक्षण असल्याने मला करोनावरील लस घेण्याची गरज नसल्याचे म्हणणाऱ्या योगगुरू रामदेवबाबांनी कोलांटउडी घेतली आहे. आता त्यांनी लवकरच लस घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.

हरीद्वारमध्ये पत्रकारांशी बोलताना रामदेवबाबांनी सर्वांना मोफत लस देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचे ऐतिहासिक पाऊल अशा शब्दांत स्वागत केले. सर्वांनी करोनावरील लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. 

त्याशिवाय, योग आणि आयुर्वेदाचे दुहेरी संरक्षणही प्राप्त करावे. त्या सर्वांच्या संयोगाने करोना संसर्गापासून प्रभावी संरक्षण मिळेल आणि करोना संसर्गाने एकही व्यक्ती दगावणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

तुम्ही केव्हा लस घेणार, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर लवकरच, असे उत्तर रामदेवबाबांनी दिले. काही दिवसांपूर्वी रामदेवबाबांनी ऍलोपथीविषयी प्रतिकूल टिप्पणी करून वादंग निर्माण केले होते. ऍलोपथीवर टीका केल्याने देशभरातील डॉक्‍टर त्यांच्यावर नाराज झाले. 

त्यातून रामदेवबाबा आणि डॉक्‍टरांच्या संघटनेत संघर्षाचे चित्र निर्माण झाले. मात्र, कुठल्या संघटनेशी माझे वैर नाही. औषधांच्या नावाखाली जनतेच्या होणाऱ्या पिळवणुकीला माझा विरोध आहे. ऍलोपथीचे चांगले डॉक्‍टर पृथ्वीवरील देवदूतच आहेत. आपत्कालीन उपचारात ऍलोपथी सर्वोत्तम आहे, असे प्रशस्तीपत्रही रामदेवबाबांनी दिले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.