मुसळधार पावसात कौलारू छतावर काढली रात्र; महिलेने सांगितल्या अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी…

'ती रात्र आठवली तरी...'

रायगड (पीटीआय) – मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जीवित व वित्तहानी झाली आहे. अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी  एनडीआरफीच्या तुकड्या अथक परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत एनडीआरएफच्या मदतीमुळे अतिवृष्टीमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका झाली असून या नागरिकांनी रौद्र रूप धारण केलेल्या पावसातील अंगावर शहारे आणणाऱ्या आठवणी सांगितल्या आहेत.

“आम्हाला स्वप्नातही वाटलं नाही की, परिस्थिती इतकी बिकट होईल. मला वाटलं पाण्याची पातळी वाढली तरी काही तासांमध्ये ती ओसरेल. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत गेली. स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी अखेर आम्ही रात्री उशिरा  घरातील सर्व वस्तू मागे सोडून छतावर जाण्याचा निर्णय घेतला.” चिपळूण येथील प्रगती राणे सांगतात.

रायगड जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात प्रगती राणे या खासगी कोचिंग क्लासेस चालवतात. मात्र अतिवृष्टीमुळे परिसरातील अन्य नागरिकांप्रमाणेच त्यांच्याही मोठ्या कष्टाने जमवलेल्या संसारास जलसमाधी मिळाली आहे.

२१ जुलैच्या मध्यरात्री अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढली. स्वतःचा व कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी राणे यांनी कष्टाने जमवलेला संसार सोडून घराच्या कौलारू छताचा आधार घेतला. ‘सातत्याने कोसळणाऱ्या पावसात आम्ही घराच्या उतरत्या कौलारू छतावर मदतीची वाट पाहत बसलो होतो.’ प्रगती राणे सांगतात.

काही तासांच्या प्रतीक्षेनंतर एनडीआरएफच्या तुकडीने प्रगती राणे व त्यांच्या कुटुंबीयांची घराच्या छतावरून सुटका केली. पावसात घर आणि सर्व साहित्य गमावलेल्या प्रगती राणे ‘ती रात्र आठवली तरी काळजात धस्स होत. मोठ्या कष्टाने जमवलेल्या वस्तुंना आता जलसमाधी मिळालीये. यानंतर आयुष्याला आता पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करायची आहे.” असं सांगतात.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.