कोथरूड हे विकासाचे सर्वोत्तम मॉडेल करण्याचा प्रयत्न

चंद्रकांत पाटील यांचा दावा : मतदारसंघ विकासाचा संकल्पनामा प्रसिद्ध

पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरूवात आहे. समृद्ध, आनंदी कोथरूड करण्यासाठी ही वाटचाल असून, कोथरूड हे राज्यातील विकासाचे सर्वोत्तम मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिले. तसेच त्यांनी “आय लव्ह कोथरूड’चा संदेशही दिला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा बुधवारी पाटील यांनी प्रसिद्ध केला. यावेळी शहराध्यक्षा माधुरी मिसाळ खासदार गिरीश बापट, राजस्थानचे खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव राजेश पांडे, कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना नेते शाम देशपांडे, नगरसेवक आणि भाजप शहर सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उज्ज्वल केसकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, पालकमंत्री म्हणून काम करताना पुण्यातील प्रश्‍नांचा अभ्यास झाला. पुढील पाच वर्षे काम करताना नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन या संकल्पनाम्यात नवीन गोष्टीही समाविष्ट केल्या जातील. वीज यंत्रणा सुधारणे, मेट्रो मार्गाचे काम लवकर पूर्ण करून मेट्रो स्टेशन आणि इतर भाग ई-बसने जोडला जाईल. असेही पाटील यांनी नमूद केले. कोथरूडमध्ये जागतिक दर्जाचे नाट्यमंदिर, ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृती जपण्यासाठी “गदिमा भवन’ उभे करणार आहे. 6 पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे हटवून नागरिकांना सुविधा देणार, विकास आराखड्याची 100 टक्के अंमलबजावणी करून नियोजित विकास करणार. ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणार असून त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र, अंथरुणाला खिळलेल्या वृद्धांसाठी सेवा केंद्र, लांबचा प्रवास शक्‍य नसल्याने त्यांच्यासाठी एखादे पर्यटन केंद्र विकसित करण्याचे तसेच कोथरूडमध्ये सांस्कृतिक विद्यापीठ उभारण्याचाही मानस असल्याचे पाटील म्हणाले.

संवेदनशील विषयांवर चर्चेतून तोडगा
संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांच्या पुतळा पुन्हा बसवण्यासंदर्भात विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोणत्याही संवेदनशील विषयाबाबत नक्की विचार काय आहेत, मानसिकता काय आहे, याचा विचार करून चर्चा करून तोडगा काढला जाऊ शकतो. अशा विषयात घाईघाईने निर्णय घेण्याची गरज नसते.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.