श्रीकांत यांना “ग” ची बाधा
नवी दिल्ली – भारतीय संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष असताना मी व माझ्या सहकारी सदस्यांनी विराट कोहलीची निवड केली, त्याला खेळण्याची संधी दिली त्यामुळेच आजचे यश तो पाहात आहे, असे माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी सांगितले आहे. कोहलीच्या यशाचे श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत असलेल्या श्रीकांत यांना ग ची बाधा झाल्याचे आता स्पष्ट होत आहे.
कर्णधारपद अत्यंत योग्य पद्धतीने सांभाळताना कोहलीने संघाला अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये आणि मालिकांमध्ये विजय मिळवून दिला. त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर जमा केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याची कामगिरी अफलातून झाली. कोहलीच्या याच यशाचे श्रेय श्रीकांत यांनी घेण्याचा अट्टाहास सुरु केला आहे, त्यावर सोशल मीडियावर श्रीकांत यांना ट्रोल केले जात आहे.
2008 साली निवड समितीचा प्रमुखपदावर काम करताना 2011 च्या विश्वकरंडकासाठी सर्वोत्तम संघ निवडणे हेच ध्येय होते. महेंद्रसिंह धोनी संघात होता, सर्व गोष्टी जमुन आल्या व आपण घरच्या मैदानावर विश्वकरंडक जिंकलो. निवड समिती प्रमुख म्हणून या विजयात आपला सहभाग असणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्या नेतृत्वाखालील समितीने कोहलीची निवड केली, त्याला त्याच्या शैलीने खेळ करण्याची मुभा दिली. त्यामुळेच तो आज हे यश पाहात आहे, असेही श्रीकांत यांनी सांगितले, मात्र त्याला कोहलीची गुणवत्ता मान्य न करता केवळ त्याचे श्रेय लाटण्याचाच हा प्रयत्न असल्याचे सिद्ध होत आहे.