पुणे – भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा विराट कोहलीने घेतलेला निर्णय एक क्रिकेटपटू म्हणून मला अत्यंत योग्य वाटतो, अशा शब्दांत पॅंथर म्हणून ओळखले जात असलेले भारताचे माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांनी कोहलीच्या निर्णयाचे समर्थन केले.
एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या एका सोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रक्षाचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते बोर्डे यांचा खास सत्कार करण्यात आला. बोर्डे यांना सन्मानपत्र व रोख एक लाख रुपये देऊन बोर्डे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना बोर्डे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी उपस्थित होते.
महान क्रिकेटपटू पद्मभूषण श्री. चंद्रकांत (चंदू) बोर्डे यांचा गौरव सोहळा आज एजिअस फेडरल लाइफ इन्शुरन्स संस्थेच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चंदू बोर्डे यांचा सत्कार माझ्या हस्ते संपन्न झाला, याचा अत्यंत आनंद आहे. pic.twitter.com/JrayIW0ni8
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 21, 2021
फलंदाजीवर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी कोहलीने भारताच्या टी-20 आणि आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठीच त्याने आपला निर्णय घेतला असून मी देखील त्याचे समर्थन करीन, असे मत बोर्डे यांनी व्यक्त केले.
कोहलीने त्याच्या कामगिरीचा विचार करून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला असावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने भारतासाठी निर्णायक भूमिका बजावली आहे. कर्णधारपदाचे दडपण कमी झाल्यास फलंदाज म्हणून त्याची कामगिरी पुन्हा सरस होइल, असा विश्वासही बोर्डे यांनी व्यक्त केला.