नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या वर्षात कमाईचा उच्चांक केला आहे. फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीत सर्वाधिक कमाई केलेल्यांच्या यादीत विराटने वर्चस्व राखले आहे.
गेल्या वर्षी कोहली दुसऱ्या स्थानावर होता, आता तो पहिल्या स्थानावर आला आहे. त्याने यंदाच्या मोसमात 252.72 कोटी इतकी कमाई केली आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी 135.93 कोटीसह पाचव्या स्थानावर आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत नवव्या स्थानावर आहे. त्याची कमाई 76.96 कोटी इतकी आहे. यादीत रोहित शर्मा 11 व्या स्थानावर आहे. ऋषभ पंत 29.19 कोटींसह 30 व्या तर, हार्दिक पांड्या 31 व्या (24.87 कोटी), जसप्रीत बुमराह 23.25 कोटींसह 33 व्या स्थानावर आहे. यादीमध्ये क्रिकेटपटू वगळता बॅटमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू 21.05 कोटींसह 63 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी सिंधू 20 व्या स्थानावर होती. तर सायना नेहवाल 58 व्या स्थानावर आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री 6.1 कोटींसह 85 व्या स्थानावर आहे.