#IPL2021 : कोहली आरसीबीचे नेतृत्वही सोडणार

यंदाच्या स्पर्धेनंतर होणार पायउतार

अबुधाबी  -विराट कोहलीने आपल्या आश्‍चर्यकारक निर्णयांमुळे चाहत्यांना एकाच आठवड्यात दुसरा धक्‍का दिला. भारतीय संघाचे टी-20 सामन्यांचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केलेल्या कोहलीने यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतर रॉयल चॅलेंजर बेंगळूरू (आरसीबी) संघाचेही नेतृत्व सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला.

आरसीबी संघ व्यवस्थापनानेच रविवारी ही माहिती दिली. याआधी त्याने टी-20 विश्‍वकरंडक
स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आरसीबीची कामगिरी सरस केली आहे. संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

संध्याकाळी मी संघ व्यवस्थापनाशी संवाद साधला. त्यांना माझ्या निर्णयाची कल्पनाही दिली. एक कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल स्पर्धा असेल. हा निर्णय माझ्या मनात गेले कित्येक दिवस घोळत होता. मी भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले. नेतृत्वाचे दडपण दूर करून वैयक्‍तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच ही निर्णय घेतला आहे.

गेली काही वर्षे मी सातत्याने खेळत आहे. मलाही विश्रांती तसेच दडपण दूर करण्यासाठी वेळ हवा आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापनाला हे कळवले आहे की मी संघात एक फलंदाज म्हणून राहणार आहे. संघाशी जोडला गेल्यापासून गेली 9 वर्षांत संघाबरोबरचा हा प्रवास खूपच अविस्मरणीय होता, असे कोहलीने संघ व्यवस्थापनाला पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे.

कोहली या स्पर्धेच्या 2008 सालच्या पहिल्या मोसमापासून आरसीबी संघासोबत आहे. त्याने 2013 साली संघाचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आजपर्यंत आयपीएलचे एकदाही विजेतेपद पटकावले नाही. त्याने आतापर्यंत 199 सामने खेळले आहेत आणि 6 हजार 76 धावा केल्या आहेत. त्यात 5 शतके आणि 40 अर्धशतके आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.