नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर आता 19 जानेवारीपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. मालिकेतील पहिला सामना पर्ल येथिल बोलँड पार्क येथे होणार आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत दोन्ही संघांची कामगिरी समसमान राहिली आहे. त्यामुळे ही एकदिवसीय मालिका रंगतदार होणार यात शंका नाही.
या एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणार्या भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यांचा विचार केला तर विराट कोहलीने 17 सामन्यांतील 15 डावांमध्ये 877 धावा केल्या आहेत. यामध्ये 160 ही विराटची सर्वाधिक वैय्यक्तीक धावसंख्या आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये आफ्रिकेत कोहलीची सरासरी 86.88 इतकी आहे. दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर तीन शतके आणि 3 अर्धशतके आहेत.
सचिन तेंडुलकर
दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर दुसर्या स्थानी आहे. सचिनने 1992 ते 2011 या कालावधीत दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 22 सामन्यांतील 22 डावांमध्ये 25 च्या सरासरीने 553 धावा केल्या आहेत. यामध्ये प्रत्येकी एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे.
राहुल द्रविड
सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर गेलेल्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रिविडने कसोटी क्रिकेटप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटही गाजवले आहे. द्रविडने दक्षिण आफ्रिकेत खेळलेल्या 11 सामन्यांतील 11 डावात 51 च्या सरासरीने 512 धावा केल्या आहेत.
यामध्ये 7 अर्धशतके धळकवणार्या द्रविडला शतक मात्र झळकावता आले नाही. दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्रविडची 84 ही सर्वोच्च वैय्यक्तीक धावसंख्या आहे.