पुणे – डीआरएसमधील अम्पायर्स कॉल आणि सॉफ्ट सिग्नल या दोन निर्णयांवरून भडकलेल्या विराट कोहलीने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे संयम दाखवणे अत्यंत आवश्यक आहे, असा सबुरीचा सल्ला माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी कोहलीला दिला आहे.
इंग्लंडविरोधातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना मैदानाबाहेर सुरू असलेली चर्चा आपल्यासाठी मूर्खपणापेक्षा कमी नसल्याचे म्हटले होते. तसेच लोकेश राहुलबाबतही विचारणा झाल्यावरही तो चिडला होता. राहुलच नव्हे तर संघातील सर्व खेळाडूंना पाठिंबा दिला जाईल तसेच त्यांना मानसिक स्वास्थ्य राखण्यासही मदत केली जाईल असे सांगताना त्याने टीकाकारांच्या वक्तव्यांना फारसे गांभीर्याने घेत नसल्याचेही सांगितले होते.
त्यावर मांजरेकर यांनी कोहलीला सबुरीचा सल्ला दिला आहे. लोक कामगिरी पाहून व्यक्त होतात हे सत्य कोहलीने आता स्वीकारले पाहिजे. कोहलीला टीकाही सहन करता आली पाहिजे तसेच त्याने धोनीप्रमाणे संयम आणि परिपक्वता दाखवली पाहिजे, असेही मांजरेकर यांनी म्हटले आहे. परिस्थिती कशीही असो धोनीने भर मैदानावर कधीही आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत.
एखाद्या खेळाडूकडून किंवा पंचांकडून जरी चूक झाली असेल तरी त्याने केव्हाही आपला राग किंवा निराशा सामना सुरू असताना व्यक्त केली नाही. हेच आता कोहलीने स्वीकारायला हवे, असेही मांजरेकर म्हणाले.