शास्त्रींच्या सल्ल्यामुळेच कोहलीने नेतृत्व सोडले

दुबई -भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही दिवसांपूर्वी आगामी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाच्या आणि आयपीएलचा यंदाचा मोसम संपल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीच कोहलीला हा सल्ला दिल्याचे आता समोर येत आहे.

कोहलीच्या या निर्णयानंतर चर्चा होत आहेत. यामध्ये 2023 सालच्या विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवले जाऊ शकते, असे संकेत शास्त्री यांनीच दिले होते.

आपली प्रशिक्षक म्हणून असलेली मुदत या स्पर्धेनंतर संपल्यावर अनिल कुंबळे संघाचे मुख्य प्रशिक्षक होणार असल्याचे संकेत मिळाल्यामुळे पुढे कोहलीच्या नेतृत्वालाच नव्हे तर संघातील स्थानालाही धोका निर्माण होऊ शकतो,

असे शास्त्री यांनीच कोहलीला सांगितले व त्यामुळेच कोहलीने हा निर्णय घेतला. शास्त्री यांनी तब्बल 6 महिन्यांपूर्वीच कोहलीला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला होता.

फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा सल्ला देतानाच वैयक्‍तिक कामगिरी सरस राहिली नाही, तर संघातील स्थानही धोक्‍यात येऊ शकते, असे शास्त्री यांनी कोहलीला सांगितले होते, असेही बोलले जात आहे.

ज्या वेळी कुंबळे संघाचे प्रशिक्षक होते तेव्हा चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान कोहली व त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला होता. कोहलीचे महत्त्व संघातून कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते व त्याला टी-20 तसेच एकदिवसीय सामन्यांच्या संघातूनही डच्चू दिला जाऊ शकतो, असेही मत शास्त्री यांनी व्यक्‍त केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.