कुलदीपच्या कामगिरीवर कोहली खुश

विशाखापट्टणम: भारताचा चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक साकारली. त्याच्या कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केला आहे.

वेस्ट इंडिजची मधली फळी स्थिरावली होती, त्यांनी सरासरी देखील सरस ठेवली होती, मात्र कुलदीपने सामन्याचे चित्रच पालटून टाकले. त्याने हॅटट्रिक घेतल्याचा आनंद तर आहेच, पण अगदी महत्वाच्या क्षणी त्याने घेतलेले बळी संघाच्या विजयासाठी निर्णायक ठरले, असेही कोहलीने सांगितले.

कुलदीप यादवने वेस्ट इंडिजच्या डावात 33 व्या षटकात लागोपाठ तीन चेंडूंवर शाय होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफ या तीन फलंदाजांना बाद करत हॅट्ट्रिक साजरी केली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक तीन हॅटट्रिक घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे.

पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम, फिरकीपटू सकलेन मुश्‍ताक, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास आणि न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्या नावावर प्रत्येकी दोन हॅट्ट्रिक आहेत. बोल्ट आणि कुलदीप वगळता या यादीतील अन्य गोलंदाज क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.