धोनीपेक्षा कोहलीच सरस – गावसकर

विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले मत

नवी दिल्ली – दशकातील सर्वात सरस खेळाडू महेंद्रसिंग धोनी नव्हे तर विराट कोहली आहे, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण, असा प्रश्‍न त्यांना एका चॅटशोमध्ये विचारण्यात आला होता, त्यावर गावसकर यांनी कोहलीच्या पारड्यात मत टाकले. 

जर व्यक्तिगत कामगिरी पाहिली तर कोहलीच सर्वोत्तम वाटतो. त्याने एक फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करताना कोहलीने उत्तम कामगिरी केली आहे आणि त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने अनेक सामने जिंकले आहेत. हे सर्व सांगत असताना फक्त धावा लक्षात घेतलेल्या नाहीत तर, खेळाडूचे वर्चस्व लक्षात घेतले आहे. हे दशक कोहलीनेच गाजवले यात शंका नाही, असेही गावसकर म्हणाले.

याच प्रश्‍नावर बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मॅथ्यू हेडन याने मात्र, धोनीच्या नावालाच पसंती दिली आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्‍वकरंडक तसेच चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. धोनी जगातील बेस्ट फिनिशर आहे. तोच सर्वोत्तम आहे. शांतपणे सर्व निर्णय घेण्याचा त्याचा गुण भावतो. एक फलंदाज किंवा यष्टीरक्षक म्हणून नव्हे तर एक कर्णधार म्हणून त्याने जे यश संघाला मिळवून दिले ते कोणीही करू शकत नाही, असे मला वाटते, असे हेडनने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.