कोहलीला झटका; बाबर आझम अव्वल स्थानी

आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी

लाहोर  -पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. केवळ 26 वर्षांच्या आझमने तब्बल 1 हजार 258 दिवस अव्वल स्थानी असलेल्या कोहलीला मागे टाकत ही कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील अफलातून कागिरीमुळे आझमने हे स्थान मिळवले. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार आझमचे 865 गुण झाले आहेत. आझमने कोहलीवर 8 गुणांची आघाडी घेतली आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल ठरलेला आझम चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी माजी कसोटीपटू झहीर अब्बास, जावेद मियांदाद व महंमद युसूफ यांनी अशी कामगिरी केली आहे. 2010 व 2012 सालच्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आझमचे पाकिस्तानच्या एकदिवसीय संघातील स्थान कायम आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याचे 837 गुण होते. मात्र, पहिल्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली. त्यानंतर तिसऱ्या व निर्णायक सामन्यात त्याने 94 धावा फटकावल्या व ही मालिका पाकिस्तानने 2-1 अशी जिंकली.

या क्रमवारीत न्यूझीलंडचा रॉस टेलर चौथ्या क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरन फिंच पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान सातव्या क्रमांकावर असून, भारताचा शिखर धवन 17 व्या स्थानी आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.