सेंच्युरीयन – यष्टीबाहेर जात असलेल्या चेंडूला बॅट लावण्याचा मोह कसोटी क्रिकेटमध्येच नव्हे तर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये टाळायला हवा असे सांगितले जाते. यालाच क्रिकेटच्या परिभाषेत अव्हॉईड आऊट साईड ऑफ ऑफ स्टम्प रोमान्स व्हेन यु बॅट असे हेटाळणीने संबोधले जाते. हाच मोह भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला भोवल्याचे येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या पहिल्या डावात दिसले.
गेल्या अनेक दिवसांपासून कोहलीच्या बॅटमधून मोठी खेळी झालेली नाही. या सामन्यात मात्र, कोहली जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने 35 धावांची खेळी करताना मोठ्या खेळीचीही शक्यता निर्माण केली होती. मात्र, कोहलीने पुन्हा तीच चूक केली जी मागील काही सामन्यात होत आहे हे कोहलीच्या लक्षात आले. त्याने नाराजीही व्यक्त केली. पण वेळ निघून गेली होती.
कोहली मैदानात उतरल्यापासून दक्षिण आफ्रिका गोलंदाजांनी त्याला सातत्याने आऊट साइड ऑफ ऑफ स्टम्प गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या जाळ्यात कोहली अलगद अडकला व बाद झाला. एन्जीडीच्या गोलंदाजीवर त्याचा संयम ढळला.गेल्या काही सामन्यांपासून ऑफ स्टम्प बाहेर जाणारा चेंडू यांच्यातील रोमान्स कोहलीला भोवत आहे.
शतक कधी साकरणार
कसोटीत 59 डावात कोहली शतक फटकावू शकलेला नाही. 2019 साली बांगलादेश विरुद्ध कोलकाताच्या मैदानात कोहलीने शतक फटकावले होते. तेव्हापासून चाहते कोहलीच्या शतकाची वाट पाहात आहेत. यावर्षीच्या जानेवारी 2020 पासून कोहलीने 14 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, त्यात एकाही मोठ्या खेळीचा समावेश नसल्याने कोहलीच्या फॉर्मवरच टीका सुरु आहे.